नागपूर- मराठी माणूस भारताचा पंतप्रधान व्हावा ही महाराष्ट्राची अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. याच मुद्दयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक भाकीत केले आहे. ते म्हणाले मराठीचा झेंडा अटकेपार लावण्याची आपल्या राज्याची परंपरा आहे. त्यामुळे २०५० पर्यंत केवळ एक नाही तर एका पेक्षा जास्त मराठी पंतप्रधान देशाला मिळतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या जागतिक मराठी संमेलनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मराठी माणूस देशाचा पंतप्रधान कधी होणार? हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला असता त्यांनी हे सूचक वक्तव्य केले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, चांगला
समाज घडविण्यासाठी समाजात परिणामकारक बदल होणे गरजेचे आहे. देशात अनेक लोकं असे आहेत की जे अजूनही बेघर आहेत. त्यात अनुसूचित
जाती-जमातींच्या लोकांचा समावेश मोठ्याप्रमाणात आहे. विकासाचा प्रवाहात आणण्यासाठी
जे सगळ्यात खाली आहेत त्यांचा विचार अधिक करावा लागतो.
आर्थिक आरक्षणाच्या
विषयावार बोलतांना ते म्हणाले की, आर्थिक
आरक्षण हा अतिरिक्त विषय असू शकतो. मात्र आजही मागासलेपण अधिक आहे. त्यामुळे जात
आहे व तोपर्यंत दाखलाही आहे. म्हणून मला असे वाटतें की याकरिता अजून थोडी वाट
पाहावी लागेल.